Ad will apear here
Next
टोकियो ते पुणे - करोना काळातलं प्रवासवर्णन... बिनचेहऱ्याच्या योद्ध्यांचं दर्शन घडविणारं..!


अतिशय द्विधा मनस्थितीत आम्ही जपान सोडलं. आता पुण्यात येऊन तीन दिवस झाले आणि भारतातल्या करोनाविरुद्धच्या लढाईचं जवळून दर्शन झालं. आपापल्या आरामदायी घरांच्या चार भिंतींत बसून जमिनीवर कुठे व किती प्रकारची लढाई चालू आहे ह्याची काहीच कल्पना येत नाही. आमच्या संपूर्ण प्रवासात आम्ही किती तरी करोना योद्धे जवळून पाहिले. ह्या लढाईत ह्या सर्वांचे योगदान अमूल्य आहे. त्यांची ऊर्जा आणि आत्मीयता वाखाणण्याजोगी आहे. बिनचेहऱ्याची ही सर्व मंडळी थोड्याच अवधीत आम्हाला बरेच काही शिकवून गेली.

वंदे भारत मोहिमेअंतर्गत भारतात परतलेल्या जोडप्याचा ब्लॉग... 
........
पुण्यातल्या पूर्व भागातल्या एका ख्यातनाम हॉटेलच्या बंद खोलीत बसून हे लिहिताना खूप गंमत वाटते आहे, केवळ तीनच दिवसांपूर्वी आपण किती काळजीत होतो आणि नर्व्हस झालो होतो ह्याची. आता सकाळच्या चहा-नाष्ट्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत सगळ्या गोष्टी अगदी हातात मिळताहेत म्हणजे आयुष्यात प्रथमच असे लाड होताहेत आणि आपण ह्यालाच इतके का घाबरलो होतो?

खरं तर जपानच्या टोकियो शहरात गेली साडेसहा वर्षं मुक्काम झाल्यानंतर आमचं भारतात कायमचं परत येणं फेब्रुवारीच्या अखेरीस ठरलं आणि ३१ मार्चचा दिवसही ठरला; पण अचानक ह्याच वेळी करोनाने जगभरात हाहाकार माजवला आणि आमच्या सगळ्याच बेतांवर पाणी फिरलं. सर्व विमानतळ आणि विमानसेवा बंद झाल्या आणि आमची परतीची वाट बंद झाली. सुमारे दीड महिन्याच्या प्रतीक्षेनंतर टोकियोच्या भारतीय दूतावासाच्या पुढाकाराने ‘वंदे भारत मिशन टू’अंतर्गत नारीता विमानतळ ते मुंबई अशी विशेष विमानसेवा ठरली आणि आम्हाला २८ मेच्या विमानाची दोन तिकिटेही मिळाली. दरम्यानच्या काळात जपाननेही त्यांच्याकडील अंतर्गत आणीबाणी शिथिल केली आणि दुर्दैवाने भारतातली, विशेषतः मुंबई-पुण्यातली परिस्थिती अजूनच बिघडत गेली. त्यामुळे आता तिकडे जावे का नाही, ह्याचा निर्णय होताहोईना. जपानमधली आटोक्यात आलेली परिस्थिती सोडून आपण भारतात जातो आहोत, प्रवासात आपण २४ तास घराबाहेर असणार, बाहेरचं अन्न खाणार, इतक्या सगळ्या वस्तूंना कळत-नकळत स्पर्श करणार, हॉटेल क्वारंटाइनमध्ये बंद खोलीत कोंडून पडणार, अशा सगळ्या विचारांनी डोकं गरगरत होतं; पण शेवटी एकदाचा निर्णय झाला आणि आम्ही २८ मेच्या सकाळी नारिता विमानतळ गाठला.



विमानतळावर आधीपासूनच भली-मोठी रांग लागलेली होती. तीन महिन्यांच्या बाळापासून ते ८० वर्षांच्या आजीबाईंपर्यंत सगळे अगदी गंभीरपणे त्यात उभे होते; पण त्यात तरुणाईची संख्या लक्षणीय होती. ह्या करोनामुळे आलेल्या आर्थिक संकटाचे बहुतेक जण बिचारे बळी ठरलेले होते. सगळ्यांची जय्यत तयारी होती - मास्क, ग्लोव्ह्ज, फेस शील्ड, सॅनिटायझर, काहींनी तर पूर्ण संरक्षक पोशाखही चढवले होते आणि हे सगळे सांभाळताना आणि प्रचंड बॅग्सनी भरलेल्या ट्रॉलीज ढकलताना सगळ्यांची तारांबळही होत होती; पण काही इलाज नव्हता. ही सगळी मंडळी सुरक्षितपणे विमानात कशी बसतील हे बघताना विमानतळ आणि विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांची दमछाक होत होती. टोकियोमधील भारतीय दूतावासाचे अधिकारी व राजदूत स्वतः जातीने सर्व व्यवस्थेवर लक्ष ठेवून होते.

एकंदरीतच नारिता विमानतळावर आल्यापासून सगळंच काही तरी ‘न भूतो न भविष्यति’ अनुभवत होतो. २०२०च्या उदरात असं काही लपलेलं आहे, असं कुणी जानेवारीच्या महिन्यातही सांगितलं असत तर त्याला वेड्यात काढलं असतं. एरव्ही गजबजलेला हा प्रचंड विमानतळ आज अगदी सुनासुना वाटत होता आणि त्यानं मनही उदास होत होतं.

शेवटी सगळे सोपस्कार उरकून आम्ही विमानाकडे निघालो. बोर्डिंग पास देण्याआधी सर्वांचं तापमान घेण्यात आलं होतंच. विमानात चढण्याआधी पुन्हा एकदा ते तपासण्यात आलं, विमानाबाहेरच सगळ्यांना दोन वेळा पुरतील इतके खाद्यपदार्थ, मास्क, सॅनिटायझर इत्यादीने भरलेल्या थैल्या देण्यात आल्या. पाण्याच्या बाटल्या तर आधीपासूनच पुढच्या सीट पॉकेटमध्ये ठेवलेल्या होत्या. सर्व जण स्थानापन्न झाल्यावर विमानाने आकाशात झेप घेतली. नेहमी रुबाबदार पोशाखात असणारे कर्मचारी आज मात्र नखशिखान्त संरक्षक पोशाखात बघणे थोडे विचित्र वाटत होते; इतके की त्यांच्यातला स्त्री-पुरुष भेदही कळेनासा झाला होता. विमानात त्यांना फक्त पायलटच्या सूचनांचं पालन करणं हे एकमेव काम होतं. अधूनमधून काही इतर सूचना मात्र ते देत होते; पण एकंदर वातावरण फारच गंभीर असल्यानं फारसं काही करायची वेळ येतच नव्हती. परिस्थितीतील तणाव समजून बच्चेकंपनीही बिचारी एकदम चिडीचूप होती.

जपानमधलं आपलं सुरक्षित घर सोडून चूक तर नाही ना केली, अशी शंका सारखी मनाला चाटून जात होती; पण आता विमानाने जपान सोडलं होत आणि परतीचा मार्ग बंद झाला होता.

जपानच्या स्थानीय वेळेनुसार दुपारी १२.१५ला निघालेलं विमान संध्याकाळी ६.४० ला मुंबईत उतरलं. इतर वेळी घाई-गडबड करणारे प्रवासी सूचनांचं पालन करीत जागेवरच बसून राहिले. एका वेळी ३० अशा संख्येनेच प्रवाशांना उतरू दिलं जात होतं. आपली वेळ येईपर्यंत बहुतेकांनी आरोग्य सेतू अॅप डाउनलोड करून घेतलं आणि आप्तेष्टांशी संपर्क साधला. विमानातून उतरल्यापासून विमानतळाबाहेर पडेपर्यंत सगळं काही अतिशय शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीनं चालल्याचं जाणवत होत. सामाजिक अंतर पाळण्याच्या सूचना वारंवार दिल्या जात होत्या आणि त्यांचं पालनही केलं जात होतं. 

‘इमिग्रेशन’-‘कस्टम्स’ करून बाहेर आल्यावर मुंबईत आणि मुंबईबाहेर जाणाऱ्या प्रवाशांच्या गंतव्य स्थानानुसार मुंबई पोलिसांतर्फे संपर्क कक्ष सज्ज होते. तिथे गेल्यावर प्रत्येकाच्या नावाचा पोलीस पास आणि घेऊन जाणाऱ्या वाहनांची लिखित माहिती हातात देण्यात आली. खालच्या मजल्यावर आल्यावर पुन्हा एकदा पोलिसांतर्फे नावं तपासून काही वेळ वाट पाहून बसमध्ये जाऊन बसण्याचे आदेश देण्यात आले.



विमानतळाबाहेर वेगवेगळ्या गावी जाणाऱ्या लाल एसटी बस आमची वाट पाहत सज्ज होत्या. त्या पाहून सगळ्यांच्याच चेहऱ्यावर हसू पसरलं; पण त्याचंही उत्तर लगेचच मिळालं. करोना संक्रमणाचा धोका नको म्हणून वातानुकूलित गाड्यांऐवजी ह्या गाड्या वापरल्या जात होत्या, जे सयुक्तिकच होतं. आमच्याच विमानात असणारे सुमारे २०-२२ प्रवासी पुण्यास जाणाऱ्या आमच्या बसमध्ये होते. इतका वेळ सामाजिक अंतर आणि परिधान केलेले मुखवटे बसमध्ये मात्र गळून पडले. मोठ्या उत्साहाने आणलेले प्लास्टिकचे फेस शील्डस तर फेकून देण्याचीच वेळ आली. गावच्या बाजाराला गावकरी जसे सामानाचे मोठाले पेटारे आणि बोचकी घेऊन बसमध्ये चढतात, त्याच पद्धतीने आम्ही आमच्या मोठाल्या पेट्या मुंबईच्या घामाच्या धारांमध्ये एसटीमध्ये चढवल्या. त्यात सगळेच सगळ्यांचं सामान उचलण्यासाठी मदत करत होते आणि एकमेकांच्या जवळ धोकादायक पद्धतीने जाण्यास मजबूर होते. आतापर्यंत रात्रीचे १० वाजून गेले होते आणि कंडक्टर साहेबांनी तिकिटे फाडल्यावर आमच्या गाडीने पुण्याचा रस्ता पकडला. गाडीतले दिवे बंद झाल्यावर आणि जरा गार वाऱ्याची झुळूक अंगावर बसून घाम सुकल्यावर डुलकी कधी लागली ते कळलंच नाही.

पुण्यात गेल्यावर कुठल्या हॉटेलमध्ये क्वारंटाइन व्हायचंय ह्याची कुठलीच पूर्वकल्पना मुंबईत देण्यात आली नव्हती. एसटीमध्ये झोपमोड झाली ती ह्या विषयावरच्या चर्चेनंच. चालकाच्या मागच्या सीटवर बसलेल्या एका तरुणाकडे ही जबाबदारी खुबीने देण्यात आली. त्यानेही अतिशय वेगाने सगळ्यांचे मोबाइल नंबर्स मिळवून एक व्हॉट्सअॅप ग्रुप बनवून त्यावर त्याच्याकडे आलेली पुण्यातल्या उपलब्ध हॉटेल्सची यादी दरपत्रकासहित पाठवली. काही मिनिटांतच सर्वांनी आपापली पसंती कळवून ती एकत्रित माहिती पुण्यात कुणाकडे तरी पाठवण्यात आली. हे सगळे होते, तोवर आम्ही तळेगाव टोलनाका पार केला होता. सोशल नेटवर्कचा इतका खुबीदार वापर आम्ही जपानमध्येही कधी पहिला नव्हता. काही मिनिटांत माहितीचे एकत्रीकरण, विश्लेषण आणि वापर अचंबित करणारा होता. हे सगळे होईपर्यंत पहाटेचा एक वाजला आणि आमची गाडी तयार झालेल्या यादीतल्या पहिल्या हॉटेलच्या दारात थांबली.

रात्री एक वाजताही पुणे-पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आरोग्य विभागाचे अधिकारी-कर्मचारी पूर्ण तयारीने त्या हॉटेलमध्ये क्वारंटाइन होणार असलेल्या प्रवाशांच्या स्वागतासाठी हजर होते. त्यांची ऊर्जा आणि उत्साह वाखाणण्याजोगा होता. काही प्रवाशांना तिथे उतरवून काही वेळाने आमची गाडी पुढच्या पसंतीच्या हॉटेलांकडे रवाना झाली. तिथेही तसाच अनुभव आला. कुणी अधिकारी आपल्या खासगी वाहनातून आमच्या गाडीला मार्गदर्शन करीत होता. कुठेही गडबड, गोंधळ, आवाज चढवून बोलणे नव्हते. सर्व अधिकारी आणि हॉटेलचे कर्मचारी अतिशय विनम्रपणे सर्व कार्यवाही व्यवस्थित पार पडत होते.

सरतेशेवटी आम्ही आमचे हॉटेल गाठले तेव्हा पहाटेचे तीन वाजून गेले होते. सकाळी घर सोडून जवळजवळ २४ तास उलटून गेले होते. कधी एकदा अंघोळ करून बिछान्यात अंग टाकू असे झाले होते. इथेही तसाच अनुभव आला. हॉटेलचा सर्व स्टाफ अतिशय चांगल्या पद्धतीने सर्व प्रक्रिया करत होता. सर्वांत विशेष म्हणजे चेक-इन करून आपापल्या खोलीत आल्यावर पहाटे चार वाजता आम्हाला गरमागरम तवा पुलाव बंद डब्यात देण्यात आला. तो खाऊन सगळा थकवा पळून गेला आणि स्वच्छ बिछान्यावर गाढ झोप लागली.

अतिशय द्विधा मनस्थितीत आम्ही जपान सोडलं. आता इथे येऊन तीन दिवस झाले आणि भारतातल्या करोनाविरुद्धच्या लढाईचं जवळून दर्शन झालं. आपापल्या आरामदायी घरांच्या चार भिंतींत बसून जमिनीवर कुठे व किती प्रकारची लढाई चालू आहे ह्याची काहीच कल्पना येत नाही. आमच्या संपूर्ण प्रवासात किती तरी करोना योद्धे जवळून पाहिले - मग ते विमानातले कर्मचारी असोत, विमानतळावरचे अधिकारी असोत, रात्रंदिवस कर्तव्य बजावणारे पोलीस असोत, आम्हाला मुंबईहून पुण्याला सुरक्षितपणे आणणारा एसटीचा चालक असो, महानगरपालिकेचे अधिकारी असोत किंवा पहाटे चार वाजता आम्हाला गरमागरम जेवण देणारे हॉटेल कर्मचारी असोत, ह्या लढाईत ह्या सर्वांचे योगदान अमूल्य आहे. त्यांची ऊर्जा आणि आत्मीयता वाखाणण्याजोगी आहे. बिनचेहऱ्याची ही सर्व मंडळी थोड्याच अवधीत आम्हाला बरेच काही शिकवून गेली. 

ह्या सर्व करोना योद्ध्यांना आमचे कोटीकोटी प्रणाम!

- मुकुल आणि अंजली नातू, पुणे
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/DZDKCN
Similar Posts
‘आमचा करोनामुक्तीचा अनुभव’ करोनाचे संकट आता अगदी आपल्या दारापर्यंत आले आहे आणि काही जणांच्या घरात ते येऊनही गेले असेल. तीव्र लक्षणे नसतील, तर होम क्वारंटाइन राहून आणि डॉक्टरी सल्ल्याचे पूर्ण पालन करून या संकटातून सहीसलामत बाहेर पडता येते. घाबरून न जाता केवळ पाळायला हवा तो संयम. ही गोष्ट आहे पुण्यातील अशाच एका दाम्पत्याची, ज्यांचा
करोना काळातही निर्भयपणे काम करणारे पुण्यातील ज्येष्ठ डॉक्टर दिलीप देवधर यांचे अनुभव माझ्यासारखा एक सामान्य फॅमिली डॉक्टर गेल्या चार महिन्यांपासून जे काही चालले आहे हे चुकीचे चालले आहे, हे सातत्याने सांगत आहे; पण इपिडेमिक अॅक्टप्रमाणे आम्ही डॉक्टर सरकारच्या निर्णयाविरुद्ध बोलू शकत नाही. म्हणून आपण आपल्या अनुभवाप्रमाणे व ‘प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसीन’च्या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे आचरणात आणायचे ठरविले
जीवनदान मिळाले, यापेक्षा दुसरा आनंद कोणता!; पुण्यातील करोनामुक्त कुटुंबाच्या भावना पुणे : ‘करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आम्ही भयभीत झालो होतो. जेव्हा आमची चाचणी करण्यात आली, तेव्हा अख्खे कुटुंब पॉझिटिव्ह असल्याचे अहवाल प्राप्त झाले. आमचं कसं होणार, आयुष्याचं काही खरं नाही, अशी चिंता लागली होती. परंतु डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांमुळे आम्ही बरे झालो,’ अशी भावना पुणे स्टेशन परिसरातील एका कुटुंबाने व्यक्त केली
... आणि मी करोनामुक्त झाले; एका बँक कर्मचाऱ्याचा अनुभव मी एक बँक कर्मचारी. पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगर येथे स्थायिक! सगळीकडेच करोनामुळे भीतिदायक वातावरण, लॉकडाउनमुळे सगळेच घरात बंद; फक्त जीवनावश्यक गोष्टींसाठी लोक बाहेर पडत होते, कुटुंबासोबत वेळ घालवत होते, वेगवेगळ्या रेसिपी करत होते; तरीही त्यांच्या मनात प्रचंड भीती! आम्ही मात्र आमच्या कामासाठी रोज बाहेर पडत होतो

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language